Thursday, April 30, 2020

महाराष्ट्राच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार – शरद पवार

महाराष्ट्राच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार – शरद पवार




लॉकडाउनमुळे उद्योग, व्यापार, व्यवहार पूर्णपणे ठप्प असून याचा विपरित परिणाम महाराष्ट्राच्या अर्थकारणावर होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी आर्थिक संकट उभं राहणार असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे असं आवाहनही केलं. सोबतच मुंबई, पुण्यात महापालिका आणि शासकीय यंत्रणेने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हाती घेतला असल्याने संख्या वाढत असल्याचं सांगितलं.

“४० दिवसांपासून सगळं काही बंद आहे. कारखाने, व्यापार, व्यवहार बंद आहेत. लोकांचे रोजगार बुडाले आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या, शासनाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार आहे. मी सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारचा २०२०-२१ चा जो अर्थसंलकल्प होता त्यात एकंदर राज्याचं महसूल उत्पन्न तीन लक्ष 47 हजार कोटीच्या आसपास जाईल असं चित्र दिसतंय. पण आज सुधारित  माहिती घेतली असता महसूलात तूट पडेल असं दिसतंय. ही तूट १ लक्ष ४० हजार कोटी इतकी असेल. याचा अर्थ एकूण येणाऱ्या उत्पन्नापैकी ४० टक्के उत्पन्न कमी होईल. याचा परिणाम सरकारच्या कामावर झाल्याशिवाय राहणार नाही. आर्थिक संकट उभं राहणार असून आपल्यासाठी ते महत्त्वाचं आहे,” असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

“मी पंतप्रधनांना यासंबंधी कल्पना दिली आहे. देशाच्या सगळ्या भागांवर हे आर्थिक संकट आहे. आपण सगळ्यांनी यावर चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे,” असं आवाहनही यावेळी शरद पवार यांनी केलं.

“मुंबई, पुणे, जळगाव, मालेगाव, औरंगाबाद येथे करोनाचा फैलाव जास्त आहे. खासकरुन मुंबई, पुण्यात जास्ता प्रभाव दिसत आहे. मुंबई, पुण्यात बहुसंख्य भाग दाटीवाटीचे आहेत. इच्छा असूनही लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळता येत नाही. म्हणून मुंबई पुण्यात संख्या जास्त आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात महापालिका, शासकीय यंत्रणेने कार्यक्रम हाती घेतला असल्यानेही संख्या वाढत आहे. सर्व करोनाचे रुग्ण असतात असे नाहीत. एकंदर आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी आपण घेत आहोत. राज्य सरकारने त्यादृष्टीने पावलं उचलत आहे,” अशी माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment

Here's your unique Code snippet. Click this code to copy it right to your clipboard.