Friday, May 1, 2020

करोना: सोलापूर नवा हॉटस्पॉट; सांगलीत रुग्णाच्या पत्नीला लागण


करोना: सोलापूर नवा हॉटस्पॉट; सांगलीत रुग्णाच्या पत्नीला लागण

पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा करोनासाठी नवा हॉटस्पॉट बनला आहे. जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येने वेगाने शंभरी ओलांडल्यानंतर शुक्रवारी आणखी ९ रुग्णांची त्यात भर पडली. दुसरीकडे सांगलीतही करोनाचा धोका कायम आहे.
सोलापूर: सोलापुरात शुक्रवारी करोनाचे ९ रुग्ण आढळून आले आहेत. आता एकूण रुग्णसंख्या १११ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात करोनाचे सहा बळी गेले आहेत. गुरुवारी एकाच दिवसात तब्बल २१ रुग्ण आढळून आल्यामुळे सोलापुरात करोनाने शंभरी पार केली होती.
शासकीय रुग्णालयातून करोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट आलेले सातजण शुक्रवारी घरी परतले. अधिष्ठाता डॉ. संजीव कपूर यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फुलांचा वर्षाव करून त्यांना निरोप दिला. याशिवाय पंढरपुरातील करोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या ४९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे या सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे डॉक्टरच्या संपर्कातील ७८ जणांचे रिपोर्टसुद्धा निगेटिव्ह आले आहेत.
मुंबईहून कवठे महांकाळ तालुक्यातील दुधेभावी येथे आलेला एक जण करोनाबाधित ठरल्याने या रुग्णाशी संबंधित कुपवाड, दुधेभावी, बामनोली येथील २८ जणांना मिरज येथील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते व त्यांचे स्वॅब करोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. यामधील २६ जणांचा करोना चाचणी अहवाल प्राप्त झाला असून यात सदर करोनाबाधित रुग्णाच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर अन्य २५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रुग्णाशी संबंधित अन्य दोन व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात उपचाराखालील करोनारुग्णांची संख्या पाच झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. खेराडे वांगी (ता.कडेगाव) येथे मुंबईहून आणलेल्या मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराशी संबंधित ३० जणांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले होते. या सर्वांचे सात दिवसानंतर करोना चाचणीसाठी घेतलेल्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना संस्थात्मक क्वारंटाइनमधून होम क्वारंटाइन करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Here's your unique Code snippet. Click this code to copy it right to your clipboard.