Friday, May 1, 2020

करोना निदानासाठी स्वस्त, जलद चाचणी विकसित

करोना निदानासाठी स्वस्त, जलद चाचणी विकसित


अमेरिकेतील वैज्ञानिकांनी कमी किमतीची कोविड १९ निदान चाचणी शोधून काढली असून त्याचा फायदा लोकांच्या मोठय़ा प्रमाणात चाचण्या करण्यासाठी होणार आहे.
 या चाचणीचे नामकरण ‘सार्स सीओव्ही २ डिटेक्टर’ असे करण्यात आले असून ही चाचणी करणे व त्याचा अर्थ लावणे सोपे आहे, असे सॅनफ्रान्सिस्कोमधील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले.
‘नेचर बायोटेक्नॉलॉजी’ या नियतकालिकात याबाबत माहिती जाहीर करण्यात आली असून ही चाचणी मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. अन्न व औषध प्रशासनाने अजून या चाचणीला मान्यता दिलेली नाही, पण ती लवकरच मिळेल यात शंका नाही.
 प्राध्यापक चार्ल शिऊ यांनी सांगितले की, यात क्रिस्पर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून ही अतिशय प्रगत चाचणी राहील. करोना विषाणूवर क्रिस्पर तंत्रज्ञानावर आधारित ही पहिलीच चाचणी आहे. आरटी- पीसीआर चाचणीच्या मदतीने निकाल मिळण्यास चार तास लागतात, पण या चाचणीत ४५ मिनिटात निकाल हाती येतो.
कुठल्याही प्रयोगशाळेत ही चाचणी करता येऊ शकेल इतकी ती सोपी आहे. ही चाचणी सोपी असून त्यातील पट्टीवर काळ्या रेषा आल्या तर तुम्हाला करोनाची लागण झाली हे दिसून येते. रुग्णाच्या एक मायक्रोलिटर नमुन्यातून १० प्रकारचे करोना विषाणू शोधण्याची क्षमता या चाचणीत आहे. सध्याच्या पीसीआर चाचण्यांपेक्षा काहीशी कमी संवेदनशील असलेली ही चाचणी असून पीसीआर चाचणी एक मायक्रोलिटर नमुन्यात विषाणूच्या ३.२ प्रती शोधू शकते.
 पण त्याने या चाचणीला मर्यादा येत नाही कारण करोनाबाधित रुग्णाच्या नमुन्यात यापेक्षा खूप जास्त विषाणू असतात.

No comments:

Post a Comment