करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या अमेरिकेतील रुग्णांची संख्या मंगळवारी १० लाखांहून अधिक झाली. या साथीत मराण पावलेल्यांचा आकडा ५८,३०० झाला आहे.
करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या अमेरिकेतील रुग्णांची संख्या मंगळवारी १० लाखांहून अधिक झाली. या साथीत मराण पावलेल्यांचा आकडा ५८,३०० झाला आहे. १९५५ ते १९७५ असे तब्बल २० वर्षे चाललेल्या व्हिएतनाम युद्धात जीव गमावलेल्या अमेरिकन सैनिकांहून ही संख्या अधिक आहे. या युद्धात ५८,२२० सैनिक मरण पावले होते. १० लाख रुग्णांचा आकडा ओलांडलेला अमेरिका हा जगातील पहिला देश ठरला आहे. ही संख्या संपूर्ण जगाच्या एक तृतियांश आहे. करोनामुळे जगभरात आत्तापर्यंत २३१,००० मृत्यू झाले आहेत. त्यापैकी अमेरिकेतील मृत्यूंची संख्या ५८,३५५ आहे.
'आम्ही सर्व रुग्णांसाठी आणि ज्यांनी आपले प्रियजन या साथीत गमावले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत. अशी परिस्थिती आधी कधीही आली नव्हती. आपण सर्वांनी मिळून या स्थितीला सामोरे जाऊन त्यावर मात करू आणी अधिक ताकदीने उभे राहू,' असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. 'तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आता करोना साथीचा वाईट काळ मागे पडला असून देशातील व्यवहार पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे,' असेही ते म्हणाले.
दरम्यान, अनेक राज्यांनी अर्थचक्राला चालना देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेव्हिन न्यूसम यांनी राज्यातील व्यवहार सुरू करण्यासाठी नियोजन आखले असून 'वस्तुस्थिती आणि आकडेवारीवर ते आधारित आहे, आपल्या इच्छेवर नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले. 'कॅलिफोर्नियात शाळा आणि कॉलेजे जुलै, ऑगस्टमध्ये सरू होतील,' असे ते म्हणाले. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी राज्यातील व्यवहार पूर्ववत करण्यासाठी पहिला टप्पा जाहीर केला आहे. टेनेसीमध्ये सोमवारपासून रेस्तराँ सुरू झाले आहेत. पेनसिल्वानियात ३ मेपासून तीन टप्प्यांत व्यवहार सुरू होतील. द. कॅरोलिना, ऑरेगॅन, ऑक्लहोमा, ओहायो यांनीही व्यवहार सुरू करण्याबाबत नियोजन केले आहे. उताहमध्ये निर्बंध कमी करून नागरिकांसाठी मास्कचे वितरण सुरू झाले.
न्यूयॉर्कमध्ये १५ मेपर्यंत लॉकडाउन
न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक रुग्ण असल्याने १५ मेपर्यंत सर्व व्यवहार बंदच राहणार आहेत. न्यूजर्सी, कनेक्टिकट, पेनसिल्वानिया, डेलवर, ऱ्होड आयलंड आण्टी मॅसाच्युसेट्सही आणखी काही काळ बंदच राहील. मात्र त्यांनी व्यवहार पूर्ववत करण्याबाबत चर्चा सुरू केली आहे.
चीनविरुद्ध मोर्चेबांधणी
चीनमधील उत्पत्ती असलेल्या करोना विषाणूची सर्वाधिक झळ सोसणाऱ्या अमेरिकेत आता त्या देशावरील अवलंबित्व कमी करण्याचा सूर अधिक तीव्र होऊ लागला आहे. एकीकडे ट्रम्प सातत्याने या वैश्विक महामारीसाठी थेट चीनला जबाबदार धरत असतानाच अमेरिकेतील राजकीय वर्तुळातूनही त्या देशाकडून भरपाई वसूल करण्याबाबत तसेच औद्योगिक उत्पादने व खनिजासाठीचे अवलंबित्व कमी करण्याबाबत आग्रह धरला जात आहे.
ट्रम्प यांचा पुन्हा हल्लाबोल
कोविड-१९ विषाणूचे उत्पत्तीस्थळ असलेल्या चीनने याचा प्रसार न रोखल्यामुळेच १८४ देशांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत, अशा शब्दांत ट्रम्प यांनी चीनला पुन्हा लक्ष्य केले. 'करोनाला उत्पत्तीस्थळीच रोखायला हवे होते. पण तसे घडले नाही. परिणामी १८४ देशांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत', असे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment